मनामा (बहरीन) -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बहरीनमधील भारतीय समुदायाला संबोधित केले. यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्यांवर भाष्य केले आहे. नॅशनल स्टेडियमवर हा कार्यक्रम झाला. भारत आणि बहरीनचे नाते केवळ दोन सरकारांमधील नाही तर संस्कारांचे नाते आहे. बहरीन बरोबर व्यापार, व्यवसायिक संबंधाबरोबर मानवता, संस्कृती आणि मुल्याचेही संबंध आहेत, असे मोदी म्हणाले.
भारताच्या पंतप्रधानांना बहरीनला येण्यासाठी भरपूर वेळ लागला असून बहरीनला येणारा मी पहिला पंतप्रधान ठरलो हे माझे भाग्य आहे', असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
तुम्ही तुमच्या भारतामधील कुटुंबीयाना विचारले तर ते ही तुम्हाला भारत बदलला असल्याचे सांगतील. भारतीय अर्थव्यवस्था 5 लाख डॉलरची बनवण्याचे आमचे लक्ष्य आहे. यासंबधीत योजना ही आमच्याकडे आहेत. भारताचा विकास होत असून भारत प्रगतीची शिखर सर करत चालला असल्याचे मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'चांद्रयान-२' या मोहिमेचे कौतूक केले. भारताच्या अंतराळ मोहिमेने अवघ्या जगाच लक्ष वेधले आहे. 'चांद्रयान-२' यशस्वीपणे मार्गक्रमण करत असून ते येत्या 7 सप्टेंबर रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. भारतासाठी हे फार मोठे यश आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
माझा मित्र मला सोडून गेला आहे. आज एकीकडे कर्तव्य पार पाडायचे आहे. तर दुसरीकडे मित्राच्या जाण्याचे दु:ख असल्याचे ते म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली.