मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये आहेत. आज (गुरुवारी) बीडमधील परळी, सातारा आणि पुण्यामध्ये ते महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. केंद्रात नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र, अशी घोषणा देऊन भाजपकडून मतदारांना पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेश केल्यामुळे तेथे विधानसभेसह लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे मोदी येथे भाजप उमेदवार उदयनराजे यांचाही प्रचार करणार आहेत. उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील लढणार आहेत. तर बीडमधील परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी मोदींची सभा होणार आहे. याबरोबरच पुणे मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा होणार आहे.
हेही वाचा -निवडणूक काळात 'एक्झिट पोल' जाहीर करण्यास निवडणूक आयोगाची मनाई
परळीत मोदी सभा घेतात खरेतर हे जिल्ह्याचे भाग्य आहे. भविष्यात आम्ही बीड जिल्ह्याच्या विकासाचे अनेक प्रकल्प पंतप्रधानांकडून मार्गी लावून घेऊ शकतो. मात्र, विरोधकांना मोदी यांच्या सभेमुळे धडकी भरली आहे. आता त्यांना काहीही भास होत असल्याची टीका पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर केली आहे. सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
मोदींच्या सभेच्या पार्श्वभुमीवर सातारा शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. सैनिक स्कूल परिसरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत. पर्यायी मार्ग खुले राहणार असून त्याचा नागरिकांना वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत.