नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (रविवार) मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केले. यावेळी बोलताना मोदींनी नवरात्र उत्सवासह येणाऱ्या विविध उत्सवांच्या शुभेच्छा जनतेला दिल्या. २ ऑक्टोबरला साजऱ्या होणाऱ्या गांधीजींच्या १५० व्या जयंती निमित्त स्वच्छतेचा संकल्प करण्याचे आवाहन मोदींनी केले. याबरोबरच इ -सिगरेटचे धोके सांगून त्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले.
मोदींनी तंबाखू आणि नशेच्या पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. तबांखू अनेक जीवघेण्या आजारांना निमंत्रण देते. तसेच त्यातील हानिकारक पदार्थांमुळे मेंदूचा विकास खुंटतो. तंबाखू शरिराला अपायकारक असल्याने त्यापासून दूर राहिले पाहिजे. नुकतेच ई सिगरेटवर( इलेक्ट्रीक सिगरेट) बंदी घालण्यात आली, कारण त्यामध्येही हानिकारक केमिकल असतात, याची लोकांनी माहिती नाही. त्यामुळे मोदींनी युवकांना ई सिगरेटपासून लांब राहण्याचे आवाहन केले.
ई- सिगरेटने शरिराला कोणताही अपाय होत नाही हा चुकीचा समज लोकांमध्ये पसरला आहे. ई - सिगरेटमध्ये निकोटीनसारखे केमिकल गरम करण्याने वेगळाच धूर तयार होतो, तो शरीरासाठी धोकादायक असल्याचे मोदी म्हणाले.