नवी दिल्ली - कोरोना विषाणूने जगभरामध्ये थैमान घातले आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण थांबवण्यासाठी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क देशांना एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यावर मालदीव, नेपाळ आणि श्रीलंका या देशांच्या नेतृत्वाने मोदींच्या कल्पनेचे स्वागत केले आहे.
नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी मोदींच्या कल्पनेचे स्वागत केले आहे. कोरोना विषाणूविरोधात सार्क देशांसोबत काम करण्यासाठी आमचे सरकार तयार आहे, असे के. पी. ओली यांनी म्हटले आहे.
श्रीलंका राष्ट्रध्यक्ष गोताबाय राजपक्षे यांनी मोदींचे आभार मानले आहेत. कोरोना विषाणूपासून देशातील नागरिकांना सुरक्षीत ठेवण्यासाठी आमचे सरकार सार्क देशासोबत करण्यास तयार असल्याचे गोताबाय म्हणाले.
कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी जागतीक स्तरावर पुढाकार घेतल्याबद्दल मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहमद सोली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करुन कोरोनो विषाणूविरोधात व्यापक उपाययोजना करण्यासाठी सार्क देशांच्या प्रतिनिधींना आमंत्रण दिले होते. 'सार्क देशांच्या नेतृत्वाने कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी एक ठोस उपायोजना करायला हवी. देशातील नागरिकांच्या आरोग्यासंबधी आपण व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून चर्चा करू शकतो आणि कोरोना विषाणूचा होणार प्रसार थांबवू शकतो', असे टि्वट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.
जगभरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे सर्वजण आरोग्याच्या सुरक्षिततेवर भर देत आहेत. वैयक्तीक स्वच्छतेबरोबरच एकमेकांशी संपर्क टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशा वेळी हस्तांदोलन न करता हाताने नमस्कार करण्याची पद्धत परदेशातही रुढ होताना पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच हस्तांदोलन करण्याएवजी भारतीय पद्धतीने नमस्कार करणे पसंद केले.