वर्धा - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वर्धा येथील गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमाला सप्त्नीक भेट दिली. यावर्षी महात्मा गांधीची १५० वी जयंती आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रपतींनी ही भेट दिली. यावेळी त्यांनी सेवाग्राम आश्रमाच्या 'व्हिजिटींग बुक'मध्ये अभिप्राय नोंदवला. यावेळी त्यांच्या सोबत पत्नी सविता कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस होते.
शांती, दया, करुणा आणि प्रेम या विचारांचे प्रतिक म्हणजे सेवाग्राम - राष्ट्रपती - सेवाग्राम आश्रम
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वर्धा येथील गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. सेवाग्राम आश्रमाला भेट देणं ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे, असा अभिप्राय त्यांनी नोंदवला.
सेवाग्राम आश्रमाला भेट देणं ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. गांधीजींच्या १५० व्या जन्मशताब्दी निमित्त आश्रमाला दिलेली भेट कायम माझ्या स्मरणात राहील. हे पवित्र स्थळ शांती, प्रेम, करुणा, दया आणि न्याय या जीवनमुल्यांचे सर्वश्रेष्ठ प्रतिक आहे. या आश्रमाची पवित्र भूमी अनेक राष्ट्रीय घडामोडींची साक्षीदार आहे. त्यांच्या जोरावरच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, असे राष्ट्रपती कोविंद यांनी लिहले आहे.
ग्रामीण भागाच्या विकासाठी प्राथमिक शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता याविषयी गांधीजींनी येथून काम केले. या कामांच्या विचारांचा पाया आश्रमातच रोवला गेला. सेवाग्राम आश्रमात गांधीनी कुष्ठरोग निवारणाचे काम सुरू केले. या कामासाठी आजही आपल्याला गांधींजीपासून प्रेरणा मिळते. जीवनामध्ये शांती, प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर जाताना गांधीजींच्या विचारांचे कायमचे मार्गदर्शन मिळत राहील, असा अभिप्राय राष्ट्रपतींनी व्हिजीटिंग बुकमध्ये नोंदवला.