नवी दिल्ली - निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी अक्षय ठाकुरची दया याचिका बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली. विनय शर्माची दया याचिका फेटाळल्यानंतर अक्षय ठाकुरने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका दाखल केली होती.
निर्भया प्रकरणातील दोषी आपली फाशीची शिक्षा लांबवण्यासाठी रोज नवे पर्याय शोधत आहेत. सुरुवातीला दोषी मुकेश शर्माने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. त्यानंतर ती याचिका फेटाळण्यात आली होती. त्यानंतर दोषी अक्षयकडून क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आले होते. अक्षयचे पिटिशन फेटाळल्यानंतर आरोपी असलेला विनय शर्मानेही राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला. त्यावर राष्ट्रपतींनी विनय शर्माची दया याचिका फेटाळली होती. विनयची याचिका फेटाळल्यानंतर अक्षय ठाकुरने 1 फ्रेबुवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका दाखल केली होती. आज राष्ट्रपतींनी ती दया याचिका फेटाळली. दरम्यान बुधवारी दोषींना फाशी देण्याबाबत न्यायालयात सुनावणी झाली. दोषींना लवकरात लवकर फाशी देण्याबाबतची केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सर्व आरोपींनी एकाचवेळी फाशी देण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, आता या निर्णयाविरोधात केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच सर्व दोषींनी कायदेशीर मार्गांचा वापर करण्यासाठी सात दिवसांचा वेळ दिला आहे. १६ डिसेंबर २०१२ मध्ये २३ वर्षीय तरुणीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. यामध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुकेश, पवन गुप्ता, विनय कुमार शर्मा आणि अक्षय ठाकूर या दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. यापूर्वी ११ मार्च २०१३ मध्ये या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंहने तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती.