नवी दिल्ली - कलम 370 हटविणे काश्मीरींसाठी फायद्याचे ठरणार आहे, असे वक्तव्य देशाोचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रपती कोविंद यांनी आज (बुधवारी) भारताच्या 73 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित केले आहे. त्यावेळी त्यांनी कलम ३७० सह देशातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे.
राष्ट्रपतींनी भाषणाच्या सुरुवातीला देशवासीयांना 73 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशातील प्रत्येकासाठी उद्याचा दिवस हा आंनदाचा दिवस आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी जीवाची बाजी लावलेल्या सैनिक आणि पोलिसांच्या योगदानाचीही कोविंद यांनी यावेळी आठवण करून दिली. तसेच त्यांच्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली.
यावर्षी महात्मा गांधींच्या जन्मास 150 वर्षे पूर्ण होत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात त्यांचे प्रेरणादायी योगदान आहे. 2 ऑक्टोबर रोजी आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करू. सरकारकडून कल्याणकारी कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या देशवासीयांचे जीवन अधिक चांगले केले जात आहे. सौरऊर्जेचा वापर वाढविण्यावर विशेष भर देणे हे ही गांधीजींच्या विचारसरणीशीही निगडीत आहे, असे ते म्हणाले.
2019 हे वर्ष गुरू नानक यांच्या 550 व्या जंयतीचे वर्ष आहे. नानक हे देशातील महान संतापैकी एक होते, असे ते म्हणाले. तर राष्ट्रपतींनी नानक यांच्या 550 व्या जयंती निमित्त सर्व भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत.