नवी दिल्ली - महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार आणि अवजड उद्योगमंत्री अरविंद गणपत सावंत यांनी राजीनामा दिला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सल्ल्यानुसार सावंत यांचा राजीनामा स्वीकारला आहे. संविधानातील आर्टिकल ७५ अंतर्गत दुसऱ्या कलमानुसार ही कार्यवाही करण्यात आली.
पंतप्रधान मोदींच्या सल्ल्यानुसार, या पदाचा अतिरिक्त कार्यभार कॅबिनेट मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनातून याविषयी परिपत्रक जारी केले आहे.
सावंत यांनी ट्विटरद्वारे भाजपवर नाराजी व्यक्त केली होती. 'शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे,' असे सावंत यांनी म्हटले होते.
'लोकसभा निवडणुकीआधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता. आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपने फारकत घेतलीच आहे,' असे आणखी एक ट्विटही सावंत यांनी केले होते.