नवी दिल्ली -आज देशभरात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. भीमराव(बाबासाहेब) आंबेडकरांची १२९वी जयंती साजरी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन केले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करत बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. आंबेडकरांनी समता आणि न्याय या दोन मुल्यांच्या आधारांवर समाजाची रचना करण्यात योगदान दिले. भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकाराला माझे वंदन. त्यांनी शिकवलेली मुल्यांपासून प्रेरणा घेऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करु, असे ट्विट कोविंद यांनी केले.
देशाच्यावतीने बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकरांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. त्यांनी एक व्हिडिओही ट्विट केला आहे. स्वातंत्र्यानंतर बाबासाहेबांनी देशाला नवी दिशा देण्याचे उद्दीष्ट भारतीयांना दिले. ते मानवतेचे खंदे समर्थक होते. त्यांनी कायम समानतेचा पुरस्कार केला आणि त्यासाठी लढा दिला. बाबासाहेब आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहेत, असे या व्हिडिओमध्ये पंतप्रधान म्हणत आहेत.
बाबासाहेब या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आंबेडकरांनी दलित, महिला आणि कामगारांच्या हक्कांसाठी लढा दिला. १४ एप्रिल १८९१ ला एका गरिब कुटुंबात जन्मलेले बाबासाहेब स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री बनले. देशाची राज्यघटना तयार करण्याचे अतुलनीय काम त्यांनी केले. १९९० ला त्यांना 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.