मुंबई - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी सकाळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची सदिच्छा भेट घेतली. लता दिदींच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानी झालेल्या या भेटीत राष्ट्रपतींनी त्यांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
राज भवनातील बंकर संग्रहालयाचे उद्घाटन करण्यासाठी राष्ट्रपती मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी भारतरत्न पुरस्कार विजेत्या लता मंगेशकर यांची भेट घेतली.
लता दिदींना भेटून आनंद झाल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले. त्यांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा; लता दिदींच्या स्वरमय आवाजाने आपल्या आयुष्यात गोडवा आणला. त्यांचा साधेपणा व मोहकता आपल्याला सतत प्रेरणा देत असल्याचे राष्ट्रपतींनी ट्वीट केले आहे.
याला प्रत्युत्तर देताना, मी कृतज्ञ आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घरी भेटायला येणं ही खूप आनंददायी आणि सन्मानीय गोष्ट आहे. त्यांना भेटून अत्यंत नम्र झाल्याचे लता दिदींनी सांगितले. तुम्ही आमचा अभिमान वाढवला असल्याचे ट्वीट लता मंगेशकर यांनी केले आहे.