हैदराबाद - पशुवैद्यकीय महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणातील एन्काऊंटर करण्यात आलेल्या चारही आरोपींचे मृतदेह ९ डिसेंबरपर्यंत जतन करून ठेवा. तसेच आरोपींच्या शवविच्छेदनाची व्हिडिओ प्रत उद्या (शनिवारी) सांयकाळपर्यंत मेहबूबनगर जिल्हा न्यायाधीशांकडे सोपवण्याचे आदेश तेलंगणा उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत.
हेही वाचा -'सरकार नेमकं कुणाच्या बाजूनं?, उन्नावमध्ये मागील ११ महिन्यात ९० बलात्कार'
आज (शुक्रवारी) घटनास्थळावर तपासासाठी आरोपींना नेण्यात आले होते. त्यावेळी आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला. यावेळी पोलीस एन्काऊंटरमध्ये चारही आरोपींचा मृत्यू झाला. त्यावरून देशभरामध्ये खळबळ उडाली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणी आता सरकारला आदेश दिले आहेत.
हेही वाचा -#hyderabadEncounter: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिले चौकशीचे आदेश
९ तारखेला संध्याकाळी ८ वाजेपर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत आरोपींचे मृतदेह जतन करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. तसेच शवविच्छेदनाची व्हिडिओ कॉपी पेन ड्राईव्ह किंवा सीडीमध्ये जिल्हा न्यायालयाकडे जमा करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. याबरोबरच मेबहुबनगर जिल्हा न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांना जमा करण्यात आलेली व्हिडिओ क्लीप आणि इतर दस्ताऐवज उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडे उद्यापर्यंत( शविवार) जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
चारही आरोपींचे शवविच्छेदन मेहबूबनगर जिल्हा रुग्णालयात केले जात आहे. शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख तसेच गांधी रुग्णालयातील न्यायवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली सुरू असल्याचे राज्याचे महाधिवक्त्यांनी सांगितले. तसेच शवविच्छेदन व्हिडिओ रेकॉर्ड केले जात असल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.
हेही वाचा -पोलिसांवर हल्ला केल्यानं आरोपींना गोळ्या घातल्या, हैदराबाद पोलिसांची पत्रकार परिषद
आरोपींच्या एन्काऊंटरनंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले तर काहींनी पोलिसांनी कायदा हातात घेतल्यावरून चौकशी करण्याची मागणी केली आहे. अनेक नेत्यांनीही पोलिसांच्या कारवाईची चौकशी करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानेही याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे.