नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मंत्रिमंडळाची व्हर्च्युअल बैठक घेतली. यामध्ये त्यांनी सर्व मंत्र्यांना कोरोनाशी लढा देण्यासाठी आपापाल्या विभागामार्फत काय केले जाईल याची योजना तयार करण्यास सांगितले. यावेळी ही आपत्ती म्हणजे मेक इन इंडियाला चालना देण्याची एक संधी असल्याचे ही मोदींनी म्हटले.
जेव्हा लॉकडाऊन संपेल, तेव्हा ज्या विभागांकडे आपण प्रामुख्याने लक्ष देऊ, अशा दहा गोष्टींची यादी प्रत्येक मंत्रालायने द्यावी. तसेच, प्रत्येक मंत्रालयाने दहा मुख्य निर्णय सांगावेत असे निर्देश पंतप्रधानांनी यावेळी मंत्र्यांना दिले.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अॅप..
देशातील शेतकऱ्यांना सध्या त्यांचा माल दुसरीकडे पोहोचवण्यास अडचण येत आहे. यामुळे ज्याप्रमाणे आपण अॅपच्या मदतीने टॅक्सी बोलावू शकतो, त्याचप्रमाणे शेतमाल पोहोचवण्यासाठीचे वाहनही अॅपच्या मदतीने मागवता येईल का याबाबत अहवाल सादर करावा, असे मोदींनी मंत्र्यांना निर्देश दिले आहेत.
यासोबत, मंत्र्यांनी राज्यांसोबत आणि जिल्हा प्रशासनांसोबत संपर्कात राहणे अत्यावश्यक आहे. त्यांना ज्या काही अडचणी येत आहेत, त्यांचे त्वरित निवारण करण्यासाठी मंत्र्यांनी तत्पर रहावे, असेही मोदींनी सांगितले.
दरम्यान, कोरोनामुळे सोशल डिस्टंसिंगवर भर देण्याबाबत सरकार नागरिकांना वारंवार सांगत आहे. त्यामुळेच या बैठकीसाठीही मंत्रीमंडळातील सदस्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाण्याचे टाळण्यास सांगण्यात आले होते. त्याऐवजी आजची बैठक व्हर्च्युअल पद्धतीने, म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे पार पडली.
हेही वाचा :'कोविड-19' विरुद्ध लढण्यास 'डीआरडीओ' सज्ज!