बुलंदशहर - एका 16 वर्षांच्या मुलीने गरोदर असल्याचे समजल्यानंतर सामूहिक बलात्काराची तक्रार व्हॉट्सअॅपवरून पोलिसांकडे पाठविली आहे. या किशोरवयीन मुलीने मागील दीड वर्षात तीन पुरुषांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा दावा केला आहे.
या प्रकरणी एका महिला सर्कल अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एक पथक मुलीच्या घरी पाठविण्यात आले. तेथे तिचे वक्तव्य नोंदविण्यात आले असून एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी एका 72 वर्षीय व्यक्तीसह तीन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'मुलीची प्रकृती वारंवार बिघडू लागल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला स्थानिक रुग्णालयात नेले. तेथे नेल्यावर ती गर्भवती असल्याचे समजले. तेव्हा तिने आपल्यावरील बलात्काराची माहिती कुटुंबीयांना दिली,' असे बुलंदशहर वरिष्ठ पोलीस अधीक्षक संतोष यांनी सांगितले.
हेही वाचा -हाथरस प्रकरण : आरोपींचा शिरच्छेद करणाऱ्याला एक कोटीच्या बक्षिसाची घोषणा, काँग्रेस नेत्यास अटक
'72 वर्षीय आरोपी श्रीचंद, 52 वर्षीय बलवीर हे दोन आरोपी असून यांनी पीडितेचा लैंगिक छळ केला. तिसरा आरोपी महेश नावाचा दूध विक्रेता आहे,' असे पीडितेने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
बलवीरने या कुटुंबाला दीड लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले होते. नुकतीच त्याने पीडितेच्या कुटुंबाकडे त्याच्या पैशांची मागणी केल्यानंतर त्यांच्यामध्ये जोरदार वादावादी झाली होती. 'वर्षभरापूर्वी बलात्कार झालेल्या मुलीच्या भावाला रेल्वे अपघातात गंभीर दुखापत झाली होती. बलवीरने नोएडाच्या फार्महाऊस मालकाकडून कुटुंबाला कर्ज उपलब्ध करून दिले होते. त्याने परतफेडीसाठी गुरुवारी त्यांच्याकडे संपर्क साधला असता, भांडण झाले, असा दावा त्याने केला,' असे संतोष यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा -एसआयटीने हाथरस पीडित कुटुंबाचा जबाब नोंदवला, तर सीबीआय देखील करणार तपास