नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूमध्ये गाठ झाल्याने आर्मीच्या रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
प्रणव मुखर्जी (वय-८४) यांची प्रकृती गंभीर असून सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर (कृत्रिम श्वसन यंत्रणेवर) ठेवण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रुग्णालयाला भेट दिली असून मुखर्जी यांच्या प्रकृतीसंबंधी विचारपूस केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव मुखर्जी यांना प्रकृती अस्वस्थ वाटत होती. डॉक्टरांनी त्यांना तपासून रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
मुखर्जींना सोमवारीच कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. ट्वीटरवरुन त्यांनी ही माहिती दिली होती. गेल्या आठवडाभरात जे माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी स्वत:ला आयसोलेट करावे. तसेच त्यांनी कोरोना चाचणी करावी, असे आवाहनही मुखर्जी यांनी केले होते.
दिवसेंदिवस देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन काम करत आहे. अशातच आता राजकीय नेतेही कोरोनाच्या विळख्यात आडकत असल्याचे दिसत आहे. प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेकांनी त्यांची प्रकृती लवकर स्थिर व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. माजी मंत्री मिलिंद देवरा यांनीही, तुम्ही लवकरात लवकर बरे व्हावेत या सदिच्छा, असे ट्वीट केले आहे. तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील मुखर्जींच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली होती.