नवी दिल्ली- भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे लष्करी रुग्णालयात निधन झाले. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. आज सकाळी रुग्णालयाने फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये गेले असल्याची माहिती दिली होती. त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. पण अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते 84 वर्षांचे होते. प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
प्रणव मुखर्जी यांना 10 ऑगस्टला श्वसन संक्रमणामुळे दिल्लीतील लष्कराच्या रेफरल व संशोधन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तसेच उपचारादरम्यान त्यांना कोरोनाचीही लागण झाल्याचे समोर आले होते. यासह त्यांच्या फुफ्फुसामध्ये संसर्ग झाला होता. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे एक पथक सातत्याने लक्ष ठेवून होते. आज त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत मुखर्जी यांनी वाणिज्यमंत्री, वित्तमंत्री, परराष्ट्रमंत्री, संरक्षण मंत्री आणि भारतीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम केले. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये प्रणव मुखर्जी पहिल्यांदा अर्थमंत्री झाले. 1984 मध्ये युरोमनी मॅगझिनने मुखर्जी यांचा गौरव केला. परराष्ट्र मंत्री म्हणून कार्यरत असताना मुखर्जी यांनी अमेरिकेसोबतच्या संबंधामध्ये सुधारणा आणली. भारत अमेरिका अणूकरार 2010 मध्ये दोन्ही देशांनी स्वाक्षरी केल्या.
राष्ट्रपती भवनाचा इतिहास सांगणारे 13 खंड मुखर्जी यांच्या काळात प्रसिद्ध झाले. 11 हजार स्क्वेअर फुट क्षेत्रात दोन संग्रहालयदेखील त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रपती भवनमध्ये सुरू झाली. यामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगितला जातो.