पणजी- माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर भाजप नेते आणि गोवा विधानसभेचे अध्यक्ष डॉ. सावंत यांनी सोमवारी मध्यरात्री मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यासोबतच महाराष्ट्रवादी गोवा पक्षनेते सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई या दोघांनाही सावंताच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली. एकाच मंत्रिमंडळात २ उपमुख्यमंत्री होणे ही गोव्याच्या राजकारणातील पहिलीच घटना आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पर्रिकरांच्या निधनानंतर गोव्यातील भाजपची सत्ता कायम राखण्याची धुरा यशस्वीप्रमाणे पार पाडली आहे. शनिवारी गोव्यात दाखल झालेल्या गडकरींनी सलग २ दिवस मॅरेथॉन बैठका घेऊन सहकारी पक्षांसह पक्षातील नाराजीवर तोडगा काढून गोव्याचा गड राखला आहे.पर्रिकरांच्या निधनानंतर सत्तास्थापनेसाठी राजकीय घडामोडींना वेग आला होता. काँग्रेसने राज्यपालांची भेट घेऊन गोव्यातील सर्वात मोठा पक्ष आम्हीच असल्याने सत्ता स्थापनेचा दावा केला. तर दुसरीकडे भाजप नेते नितीन गडकरी यांनी गोव्यात दाखल होत भाजप कार्यकर्त्यांच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या आणि मुख्यमंत्री पदाचे नाव निश्चित केले.
यावेळी भाजपला पाठिंबा देणाऱ्या सहयोगी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनीही आपल्या मागण्या भाजप पुढे ठेवल्या. मगोपच्या सुदीन ढवळीकरांनी तर मुख्यमंत्रीपदावर दावा केला. मात्र, भाजपने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत भाजपच्या १२ आमदारांपैकीच मुख्यमंत्री करण्याचे निश्चित केले. त्यामध्ये डॉ. प्रमोद सावंत आणि विश्विजीत राणे यांची नावे आघाडीवर होती. दरम्यान सोमवारी दुपारी भाजपकडून डॉक्टर सावंतांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आला. मात्र, ते विधानसभा सभापती असल्याने त्यांच्या नावाला विरोधही करण्यात आला.
या दरम्यान, काँग्रेसने राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणारे एक पत्र त्यांना सादर केले. मात्र, ते बहुमत सिद्घ करू शकत नव्हते. शेवटी भाजपने चर्चेअंती प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान केलेच.
सोमवारी रात्री राजभवनातील दरबार हॉलमध्ये त्यांचा शपथविधी पार पडला. गोव्याच्या राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी डॉ. सावंत यांचे कुटुंबीय आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आयुष मंत्री तथा उत्तक्ष गोव्याचे व खासदार श्रीपाद नाईक आणि आघाडीतील घटक पक्षांचे आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी सावंत यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला. डॉ. सावंत साखळी मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
गोव्यात पहिल्यांदाच २ उपमुख्यमंत्री -