नवी दिल्ली -भाजपच्या लोकसभा सदस्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. बुधवारी लोकसभेमध्ये एसपीजी संशोधन विधेयकावर चर्चा करताना प्रज्ञा यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथूराम गोडसेला पुन्हा एकदा देशभक्त म्हटले आहे.
लोकसभेमध्ये एसपीजी संशोधन विधेयकावर डीएमस सदस्य ए राजा बोलत होते. ए राजा यांनी आपले मत मांडताना गोडसेचं उदाहरण दिले. यावेळी प्रज्ञा ठाकूर यांनी मध्येच हस्तक्षेप करत आपण 'देशभक्तांचे उदाहरण देऊ शकत नाही, असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर लोकसभेत गदारोळ झाला. लोकसभेत नथुराम गोडसे यांचा 'देशभक्त' असा उल्लेख केल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना 'मी यावर उद्या उत्तर देईन', असे त्या म्हणाल्या. नथुराम यांचा देशभक्त असा उल्लेख करण्याची साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची ही पहिली वेळ नाही. यापुर्वी देखील त्यांनी नथुराम गोडसे हे देशभक्त होते, आहेत आणि असतील असे म्हटले होते. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. नुकतचं संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीमध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचाही समावेश करण्यात आला आहे. या २१ सदस्यीय समितीचे प्रमुख केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह असणार आहेत. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत.भोपाळच्या खासदार असलेल्या प्रज्ञा यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचा २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव केला होता. सध्या त्यांच्याविरूद्ध अनेक गुन्ह्यांसाठी बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत खटला चालू आहे.