आलाप्पुहा (केरळ) - केरळमधील सर्वात मोठी नौका शर्यत म्हणजेच नेहरू ट्रॉफी बोट रेस मागील 67 वर्षांत यंदा पहिल्यांदाच रद्द झाली आहे. कोरोनामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोट रेस समितीने सांगितले आहे. यामुळे चाहत्यांमध्ये निराशा आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक ही नौका शर्यत बघण्यासाठी गर्दी करत असतात.
नेहरू करंडक रेगट्टा सुरू झाल्यापासून आजवर कधीही रद्द करण्यात आला नव्हता. गेल्या 67 वर्षांची परंपरा यावेळी प्रथमच खंडित होणार आहे. केरळमधील आलाप्पुहा जिल्ह्यातील पुन्नमदा बॅकवॉटर्समध्ये दरवर्षी ऑगस्टच्या दुसर्या शनिवारी ही शर्यत भरते. मागील दोन वर्षांत पुरामुळे शर्यतीची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. मात्र नंतर पुन्हा नेहरू करंडक आयोजित करण्यात आला. यंदा नौका करंडक प्रेमी या पर्वणीला मुकणार आहेत.