नवी दिल्ली - अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ आणि संरक्षणमंत्री मार्क एस्पर भारत दौऱ्यावर आले आहेत. दोन्ही देशाच्या नेत्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. पॉम्पिओ आणि एस्पर यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशीही सखोल चर्चा केली. अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक एका आठवड्यावर आली असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांची भारत भेट महत्त्वाची समजली जात आहे.
प्रादेशिक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा
भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखमधील सीमेवरून वाद सुरू आहे. त्यावर अद्यापही तोडगा निघाला नाही. त्यासोबतच दक्षिण चिनी समुद्रात चीनची दादागिरी सुरू आहे. तैवान आणि हाँगकाँगवर चीनची दडपशाही सुरू आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रावर चीन वर्चस्व गाजवू पाहत असताना त्यास अमरिकेने विरोध केला आहे. चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या धोरणाविरोधात अमेरिकेने कठोर धोरण स्वीकारले आहे.