नवी दिल्ली -हवेतील प्रदूषकांच्या वाढत्या प्रमाणामुळे राजधानी दिल्लीत श्वास घेणे कठीण झाले आहे. मंगळवारी (दि.12नोव्हेंबर)ला सकाळी शहरातील आनंद विहार भागात प्रदूषणाची पातळी 'अतिगंभीर' श्रेणीत पोहोचली. आज येथील एअर इंडेक्स 450 नोंदवण्यात आला असून, अनेक दिवसांपासून याच प्रकारचा निचांकी एअर इंडेक्सची नोंद होत असल्याने शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे.
वाहने आणि कारखान्यांमधील धुरामुळे प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्याने राजधानीचा श्वास गुदमरत आहे. प्रदूषण वाढीचे प्रमाण कायम
दिल्लीलगत असलेल्या गाझियाबाद आणि नोएडामध्येही प्रदूषणाचा आलेख सतत वाढत आहेत. आज सकाळी गाझियाबादच्या इंदिरापूरम येथील एअर इंडेक्स 441 नोंदवण्यात आला. या ठिकाणी देखील हवा 'अतिगंभीर' श्रेणीत आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेचा वेग सध्या कमी असल्यामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणात वाढ होत आहे. हवा वाहती नसल्यामुळे एकाच प्ररकारच्या वातावरणात प्रदूषके साठत आहेत. हवेचा वेग वाढल्यास ही प्रदूषके इतर भागात वाहून शहरातील वातावरण सुधारण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, प्रदूषण कमी करण्याचा हा उपाय नसल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.
प्रदेशनिहाय प्रदूषणाची स्थिती :
- आनंद विहार 442
- अशोक विहार 438
- बवाना 445
- डीटीयू 406
- द्वारका सेक्टर-8 435
- जहांगीरपुरी 410
- नजफगढ 365
- पूसा 400
- पंजाबी बाग 420
- पटपडगंज 421
- रोहिणी 440
- ओखला 423