अर्थसंकल्पावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया; जाणून घ्या कोण काय म्हणाले? - Political leaders' reaction on budget
अर्थसंकल्पावर विविध प्रतिक्रिया येत असून काहींनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. तर काहींनी या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्था मजबूत होईल असे म्हटले आहे.
अर्थसंकल्पावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया
नवी दिल्ली -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज वर्ष २०२०-२१ चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी 2021 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या विकासदरात दहा टक्क्यांनी वाढ होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. या अर्थसंकल्पावर विविध प्रतिक्रिया येत असून काहींनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. तर काहींनी हा अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्था मजबूत होईल असे म्हटले आहे.
- काँग्रेस नेता राहुल गांधी- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल भाषण अत्यंत पोकळ आश्वासनाचं आहे. हा अर्थसंकल्प गुंतागुंतीचा असून बेरोजगारीवर या अर्थसंकल्पात ठोस तरतूदच करण्यात आली नाही. सरकारची मानसिकता दर्शवणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
- माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम - आज पहिल्यांदाच सर्वात मोठं बजेट भाषण ऐकले. एवढ्या मोठ्या भाषणात मला कोणताही अविस्मरणीय विचार किंवा घोषणाही दिसली नाही, तसेच सरकारने अर्थव्यवस्था सुधारण्यावर काहीच भर दिला नाही, असे चिदंबरम म्हणाले.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी - या अर्थसंकल्पातून मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्झिमम गव्हर्नन्सच्या आश्वासनाला बळकटी मिळणार आहे. तसेच अर्थसंकल्पात पायाभूत सेवा क्षेत्राला प्रोत्साहन दिले आहे. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांचा असून यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल, असे मोदी म्हणाले.
- मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ -अर्थसंकल्पाचे भाषण निश्चितच लांब होते. मात्र, त्यामध्ये आकडेवारीची गुंतागुत होती. या अर्थसंकल्पात खेडे, गरीब, शेतकरी, तरुण, रोजगार आणि महिलांच्या संरक्षणासाठी काहीही तरुतूद नाही, असे कमलनाथ म्हणाले.
- काँग्रेस नेता मनीष तिवारी - आम्हाला अर्थसंकल्पावरून राजकारण करायचे नाही. मात्र, अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये सुधारणा करण्यासाठी योग्य ते पाऊल उचलण्यात आले नाही. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी काहीही करण्यात आले नाही, असे काँग्रेस नेता मनीष तिवारी म्हणाले.
- काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला -भाजपा सरकारने अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करणे, खासगी गुंतवणूकीला प्रोत्साहन देणे , रोजगार निर्माण करणे या कल्पनांचा त्याग केला आहे. विकास, रोजगार गहाळ झाला असून गुंतवणूक बंद आहे. शेती संकटात अशून व्यापार बंद झाला आहे. जीडीपी घरसला असून देश आर्थिक आणीबाणीच्या स्थितीत आहे, असे रणदीप सुरजेवाला म्हणाले.
- दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल - अर्थसंकल्पातून दिल्लीला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, पुन्हा एकदा दिल्लीकरांवर अन्याय करण्यात आला आहे. दिल्ली भाजपच्या अग्रक्रमात येत नाही, मग दिल्लीला भाजपने मतदान का करावे? जर भाजपा निवडणुकीपूर्वी दिल्लीकरांना निराश करीत आहे, तर निवडणुका झाल्यानंतर आश्वासने पाळेल काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे, असे अरविंद केजरीवाल यांना म्हटले आहे.