आज महाराष्ट्र दिन! संयुक्त महाराष्ट्राचा हा हिरकमहोत्सवी वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने देशभरातील नेते आणि कलाकार मराठी बांधवांना शुभेच्छा देत आहेत.
- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत मराठी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ट्विट करत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसमोर सध्या कोरोनारूपी आव्हान उभे ठाकले आहे. राज्याला पुन्हा आर्थिक उभारी देण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने उभे राहण्याचा प्रण करूया. सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!" अशा शब्दांमध्ये त्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
- यासोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संयुक्त महाराष्ट्राचा लढा महाराष्ट्राने ज्या ताकदीने लढवला त्याच ताकदीने आज ‘कोरोना’विरुद्ध लढू आणि जिंकू, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात रस्त्यावर उतरुन संघर्ष केला होता, यावेळी प्रत्येकाने आपापल्या घरातच थांबून कोरोनाविरुद्ध लढायचे आहे, कोरोनाला हरवायचे आहे. त्यासाठी घराबाहेर पडू नका, रस्त्यावर येऊ नका, घरातच राहा, सुरक्षित रहा, असे आवाहनही त्यांनी पुन्हा एकदा राज्यातील जनतेला केले आहे.