महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गोव्याचो गोंधळ; आतापर्यंतच्या राजकीय उलथापालथींचा आढावा! - congress

काँग्रेस संधी मिळेल तेव्हा सत्ता स्थापनेचा दावा करत आले आहे. त्यामुळेच की काय भाजपने आता थेट काँग्रेसच्या आमदारांनाच फोडले आहे. त्यामुळे आता भाजप पुन्हा एकदा गोव्यात मोठा पक्ष म्हणून समोर येईल.

गोव्याचो गोंधळ; आतापर्यंतच्या राजकीय उलथापालथींचा आढावा!

By

Published : Jul 10, 2019, 11:28 PM IST

पणजी- आधी तेलंगणा, नंतर कर्नाटक आता गोव्यातही काँग्रेसला भगदाड पडले आहे. गोव्यातील काँग्रेसच्या 15 पैकी 10 आमदारांनी राजीनामा दिला आहे. हे सर्वजण आता भाजपमध्ये जाणार आहेत. त्यामुळे गोव्यात सत्तास्थापना सोडाच पण आमदार टिकवून ठेवणे काँग्रेसला अवघड झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गोव्यात आत्तापर्यंत घडलेल्या घटनांचा आम्ही घेतलेला मागोवा.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री राहिलेले दिवंगत मनोहर पर्रीकर केंद्रात गेले, अन् तिथूनच भारतीय जनता पक्षाची गोमंतकींयावरील पकड सैल झाली. गोव्यात ४ फेब्रुवारी २०१७ ला घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष १७ जागांवर विजय मिळवून सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला. तर, भाजपला १३ जागांवर समाधान मानावे लागले. यापूर्वी मागील निवडणुकीत मनोहर पर्रीकर ह्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला २१ जागांसह बहुमत मिळाले होते. २०१४ साली पर्रीकरांनी भारताचे संरक्षणमंत्रीपद स्वीकारले व गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. लक्ष्मीकांत पार्सेकर ह्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने २०१७ ची निवडणूक लढवली.

काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर गोव्यातील राजकीय हालचालींना वेग आला. कसेही करून गोवा ताब्यात ठेवायचा या उद्देशाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेते गोव्यात ठाण मांडून बसले. झालेही तसेच २ अपक्ष आमदारांनी तसेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व गोवा फॉरवर्ड पार्टी या २ पक्षांच्या प्रत्येकी ३ आमदारांनी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला. त्यांच्या अटीनुसार संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर ह्यांनी पुन्हा गोव्याच्या राजकारणात परतून मुख्यमंत्रीपद स्वीकारले व १४ मार्च २०१७ रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेस पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून देखील त्यांच्या पदरी निराशा आली.

दरम्यान, मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या (१७ मार्च 2019) निधनाने गोव्यात पुन्हा पोकळी निर्माण झाली. गोव्यातील राजकीय घडामोडीचा गुंता वाढला. भाजपकडे असलेले मुख्यमंत्रीपद धोक्यात आले. विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसने गोव्याच्या राज्यपालांकडे पुन्हा सत्तास्थापनेसाठी दावा केला. 40 सदस्य संख्या असलेल्या गोवा विधानसभेत मनोहर पर्रिकरांच्या निधनाने रिक्त जागांची संख्या 4 वर पोहोचली. काँग्रेसचे आमदार सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे काँग्रेस 2 आणि भाजप 2 सदस्य घटल्यामुळे विधानसभेचे संख्याबळ 40 वरून 36 वर आले.

त्यामुळे १४ आमदार असलेल्या काँग्रेसच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या. त्यांनी तातडीने सत्तेवर दावा सांगितला. मात्र, प्रत्येकी अवघे ३ सदस्य असलेल्या महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीचे सुदिन ढवळीकर आणि गोवा फॉर्वर्ड पार्टीचे प्रमुख विजय सरदेसाई या २ घटक पक्षांच्या नेत्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याची तडजोड स्वीकारत भाजपने सत्ता टिकवली. यामुळे गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी प्रमोद सावंत विराजमान झाले.

काँग्रेस संधी मिळेल तेव्हा सत्ता स्थापनेचा दावा करत आले आहे. त्यामुळेच की काय भाजपने आता थेट काँग्रेसच्या आमदारांनाच फोडले आहे. त्यामुळे आता भाजप पुन्हा एकदा गोव्यात मोठा पक्ष म्हणून समोर येईल.

राजीनामा दिलेले आमदार -
आमदार बाबू कवलेकर, बाबुश मोनसर्राट्टे आणि त्यांची पत्नी जेनीफर मोनसर्राट्टे, टोनी फर्नांडिस, फ्रान्सिस सेल्विरा, फिलिप नेरी रॉड्रिग्स, विलफ्रेड डे सा, निलकांत हळकणकर आणि इसिदोर फर्नांडिस यांचा समावेश आहे. या आमदारांच्या राजीनाम्यामुळे सध्या सत्तेत असलेल्या भाजपची ताकत आणखी वाढणार आहे. शिवाय भाजपसोबत सत्तेत असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार आणि उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांचे पद काढून घेतले जाण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details