रांची - झारखंडमध्ये कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या हिंदपीढी भागातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. वेळेवर रुग्णालयात जाता न आल्याने एका गर्भवतीमहिलेच्या बाळाचा मृत्यू झाला. पत्नीला रुग्णालयात घेऊन निघाल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात जाऊ दिले नाही, म्हणून आमचे बाळ दगावले, असा आरोप महिलेचे पती इम्तियाज यांनी केला आहे.
हिंदपीढी हा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. त्यामुळे पोलिसांनी हा परिसर सील केला आहे. रविवारी रात्री याच परिसरात राहणाऱ्या नरगिस नावाच्या महिलेला प्रसववेदना सुरू झाल्या. नरगिसचे पती इम्तियाज त्यांना रुग्णालयात घेऊन निघाले. मात्र, पोलिसांनी त्यांना रुग्णालयात जाऊ दिले नाही. वारंवार विनंती करुनही पोलिसांनी दाम्पत्याला घरी पाठवले.
निराश होऊन इम्तियाज आपल्या पत्नीला घरी घेऊन आले. त्यानंतर शेजारील काही महिलांनी नरगिस यांची प्रसूती केली मात्र, यादरम्यान बाळाचा मृत्यू झाला. पोलिसांच्या आडमुठेपणामुळे आम्ही आमचे पहिले अपत्य गमावले असा आरोप नरगिस आणि इम्तियाज यांनी केला आहे.
या प्रकरणाची माहिती पोलीस अधिक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱयांना देण्यात आली आहे. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. नरगिस आणि इम्तियाज यांनी केलेले आरोप खरे निघाल्यास कर्मचाऱयांवर कारवाई करण्यात येणार आहे.
या घटनेनंतर रांची पोलीस विभागाने काही अत्यावश्यक मदत क्रमांक जाहीर केले आहेत. कोरोना हॉटस्पॉट असलेल्या भागात आरोग्यविषयक आणीबाणी असल्यास तत्काळ दिलेल्या क्रमांकावर मदत मागण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.