नवी दिल्ली - हिंसाचार प्रकरणी दिल्ली गुन्हे शाखेच्या अंतर्गत दोन विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहेत. हिंसाचार प्रकरणी दाखल झालेल्या सर्व तक्रारींवर विशेष तपास पथक चौकशी करणार असून या दोन्ही पथकाचे नेतृत्व गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस बी.के. सिंह करणार आहेत.
गुन्हे अन्वेषण विभागाचे डीसीपी जॉय टिर्की हे एका पथकाचे तर गुन्हे अन्वेषण विभागाचे डीसीपी राजेश देव हे दुसऱ्या पथकाचे नेतृत्व करणार आहेत. गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस बी. के. सिंह यांच्या अंतर्गत दोन्ही पथके कार्य करणार आहेत.
हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत तब्बल 48 तक्रार दाखल झाल्याचे दिल्ली पोलीस प्रवक्ते एम. एस. रंधावा यांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस तपास करत असून अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. ईशान्य दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आल्याचेही ते म्हणाले.
दिल्ली हिंसाचारात मृतांचा आकडा वाढून ३८ झाला आहे. पोलीस आणि निमलष्करी दलाकडून हिंसाग्रस्त परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत आहे. तीन दिवस चाललेल्या हिंसाचारात २०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. ईशान्य दिल्लीतील अनेक ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कडेकोट बंदोबस्त संवेदनशील भागांमध्ये ठेवण्यात आला आहे. सीएए समर्थक आणि सीएएला विरोध करणाऱ्या नागरिकांमध्ये २३ फेब्रुवारी रोजी हिंसाचार पसरला होता.
हेही वाचा - दिल्ली हिंसाचार : मृतांचा आकडा 36 वर, तर २०० पेक्षा जास्त जण जखमी