श्रीनगर - दहशतवाद्यांशी लागेबांधे असल्याप्रकरणी जम्मू काश्मीर पोलिसांनी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला शनिवारी अटक केली आहे. देविंदर सिंग असे देशविरोधी कायवाया केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. दहशतवाद्यांना घरामध्ये थारा देण्यासाठी आणि स्वत:च्या गाडीतून घेवून जाण्यासाठी देविंदर सिंग यांने १२ लाख रुपये घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
देविंदर सिंग पोलीस उपअधीक्षक म्हणून जम्मू काश्मीर पोलीस दलात कार्यरत होता. याप्रकरणी गुप्तचर यंत्रणांच्या विविध विभांगाद्वारे त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. यातून अजून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा, काश्मीर सीआयडी, रॉ या गुप्तचर विभागांद्वारेही सिंग याची चौकशी करण्यात येणार आहे.
सिंग उपपोलीस निरिक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाला होता. मात्र, काही अवधीतच पोलीस उपअधीक्षक पदापर्यंत मजल मारली होती. घातपात विरोधी पथकामध्ये उत्तम काम केल्यामुळे सिंग याला गौरवण्यातही आले होते.
संसदेवरील हल्ला प्रकरणातील आरोपी अफजल गुरु यानेही न्यायालयात सुनावणीवेळी सिंग याच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र, अफजल गुरु दहशदवादी कारवायांत गुंतला असल्याने काश्मीर पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी हे आरोप खोडून काढले होते. 'माझ्या म्हणण्यानुसार काम केले नाही तर संपूर्ण कुटुंबाला मारुन टाकण्याची धमकी सिंग याने दिल्याचे गुरुने चौकशी दरम्यान सांगितले होते'. सिंग याच्या म्हणण्यानुसार संसदेवर हल्ला केल्याचे अफजल गुरुने सांगितले होते. तसेच दिल्लीत फ्लॅट आणि कार भाड्याने घेवून हल्ला करण्यास बळजबरी केल्याचे अफजल गुरूने सांगितले होते.
शनिवारी सिंग याला २ दहशतवाद्यांना कारमध्ये जम्मूला घेवून जाताना अटक करण्यात आली. कुख्यात दहशतवादी नावेद बाबा याला शोपिया जिल्ह्यातून जम्मू येथे घेवून जात असताना पोलिसांनी अटक केली. ११ सर्वसामान्य नागरिकांना मारल्या प्रकरणी नावेद पोलिसांना हवा होता. व्यापारी, ट्रक ड्रायव्हर, कामगार यांना नावेदने मारले आहे.
सिंग याने नावेद आणि त्याच्या सहकाऱ्याला जम्मू आणि शोपिया येथील घरी आश्रय दिल्याचे तपासात पुढे आले आहे. अटक करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीत आणि घरी मारलेल्या छाप्यात पोलिसांना शस्त्रास्त्रेही आढळून आली आहेत.