लखनौ - मॉब लिंचिंगच्या मुद्द्यावर बसप अध्यक्ष मायावती यांनी ट्विटरवरून निशाणा साधला. त्यांनी मॉब लिंचिंगच्या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मॉब लिंचिंग हा भयानक आजार आहे आणि आता पोलिसही त्याचे बळी ठरत असल्याचा आरोप त्यांनी ट्विटरवरून केला.
मॉब लिंचिंग एक मोठ्या आजाराप्रमाणे देशात पसरत आहे. यामध्ये भाजप सरकारच्या राज्यात कायद्याचे राज्य प्रस्थापित न करण्याची धोरण याला कारणीभूत आहे. यामुळे आता केवळ दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाचे लोकच नाही तर सर्व समाजातील लोक याला बळी पडताहेत. तसेच, पोलिसही यातून सुटलले नाहीत, असा आरोप मायावती यांनी ट्विटरवरून केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्राने मॉब लिंचिंगवर कायदा करणे आवश्यक होते. परंतु लोकपालाप्रमाणेच मॉब लिंचिंगच्याही प्रकरणात केंद्र सरकार उदासीन असल्याचे दिसत असल्याचे त्या म्हणाल्या.मायावती यांच्यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी मॉब लिंचिंगवर मोठे वक्तव्य केले होते. दिल्लीत आम्ही राहतो किंवा काम करतो अशा ठिकाणी भीतीचे कोणतेही वातावरण नाही. मात्र, छोट्या गावांमध्ये आणि छोट्या शहरांमध्ये याची भीती कायम आहे. ही भीती प्रत्येक भारतीयाने कमी केली पाहिजे, असेही ते म्हणाले.