महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पीएनबी घोटाळा : मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी एअर अॅम्ब्युलन्स पाठवू, ईडीचा युक्तिवाद - ed

'चोक्सीला कॅरेबिअन देश अँटिग्वा येथून भारतात आणण्यासाठी एअर अँब्युलन्स पाठवण्यासही तयार आहोत, यामध्ये वैद्यकीय तज्ज्ञ मंडळी असतील. त्याचबरोबर चोक्सीला भारतात सर्व प्रकारच्या आवश्यक वैद्यकीय सुविधा देखील पुरवण्यात येतील,' असा युक्तिवाद ईडीने न्यायालयात केला आहे.

मेहुल चोक्सी

By

Published : Jun 22, 2019, 5:29 PM IST

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावणाऱ्या मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी एअर अॅम्ब्युलन्स पाठवू, असा युक्तिवाद ईडीने मुंबईच्या पीएमएलए न्यायालयात केला आहे. ईडीने लिखित स्वरूपात न्यायालयाला आपले म्हणणे सादर केले आहे. चोक्सी सध्या अँटिग्वा येथे असून आरोग्याचे कारण देत त्याने चौकशीसाठी भारतात येण्यास वारंवार टाळाटाळ केली आहे.

काही दिवसांपूर्वीच चोक्सीने 'मी भारतातून पळालो नाही. उपचारांसाठी परदेशात गेलो आहे,' असे न्यायालयाला कळवले होते. यानंतर 'चोक्सीला कॅरेबिअन देश अँटिग्वा येथून भारतात आणण्यासाठी एअर अँब्युलन्स पाठवण्यासही तयार आहोत, यामध्ये वैद्यकीय तज्ज्ञ मंडळी असतील. त्याचबरोबर चोक्सीला भारतात सर्व प्रकारच्या आवश्यक वैद्यकीय सुविधा देखील पुरवण्यात येतील,' असा युक्तिवाद ईडीने न्यायालयात केला आहे.

'मेहुल चोक्सीने तपासामध्ये कधीही सहकार्य केलेले नाही. त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही काढली आहे. मात्र, तरीही तो परत येण्यास तयार नाही. त्यामुळेच त्याला फरार घोषित करण्यात आले आहे. चोक्सीला चौकशीत सहभागी होण्यासाठी अनेकदा संधी देण्यात आली. मात्र, तो चौकशी कायमच टाळली आहे,' असे ईडीने सांगितले.चोक्सी याने न्यायालयाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात 'मी देश सोडून पळालो नाही. तर, उपचारासाठी मला देशाबाहेर जावे लागले. मी सध्या अँटिग्वामध्ये राहत असून तपास यंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करत आहे. न्यायालयाने परवानगी दिल्यास दिल्यास तपास अधिकारी चौकशीसाठी येथे येऊ शकतात. तसेच, सध्या विशेष न्यायालयासमोर आणि तपास अधिकाऱ्यांसमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे खटल्याला उपस्थित राहण्याची माझी तयारी आहे,' असे म्हटले होते.
चोक्सीने भारतातील आपले वकील विजय अग्रवाल यांच्यामार्फत हे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्याने आजारी असल्याचे पुरावेही सादर केले होते. याशिवाय, आपली ६ हजार १२९ कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केल्याचा दावा चोक्सी याने केला होता. मात्र, ईडीने प्रतिज्ञापत्र सादर करत केवळ २ हजार १०० कोटी रुपयांची संपत्तीच जप्त केली असल्याचे म्हटले आहे. फरार उद्योगपती मेहुल चोक्सी हा पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेल्या नीरव मोदीचा मामा आहे. तोही या प्रकरणात प्रमुख आरोपी आहे. हे दोघेही सध्या तपास यंत्रणांना चकवा देत परदेशात राहात आहेत. गेल्या वर्षी उघडकीस आलेल्या या घोटाळ्यात १३००० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला होता. या दोघांनी त्यांनी बँकेला फसवून कर्जे न फेडताच देशातून पळ काढला आहे. या घोटाळ्यात बँकेच्या काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details