लंडन- पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी नीरव मोदीच्या अडचणीत वाढ झाली आहे. ब्रिटनच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयामध्ये सुनावणीसाठी आणले असता, न्यायालयाने त्याला २७ फेब्रुवारीपर्यंत कोठडीत पाठवले आहे. साधारणपणे दोन अब्ज डॉलर्सचा घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी नीरव मोदी भारतातून फरार आहे.
याबाबत बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले, की आम्ही नीरव मोदीला भारतात आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत. सध्या लंडनच्या न्यायालयात त्याच्याविरूद्ध खटला सुरू आहे. तसेच या प्रकरणातील दुसरा महत्त्वाचा आरोपी असणाऱ्या मेहुल चोक्सीबाबतही आम्ही एंटीगुआ आणि बारबुडाच्या सरकारसोबत चर्चा करत आहोत. त्यांना आम्ही लवकरात लवकर त्यांची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यासाठी सांगणार आहोत, जेणेकरून त्यालाही तातडीने भारतात आणता येईल.