नवी दिल्ली - आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रिजर्व बँक ऑफ इंडीयाने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर(पीएमसी) निर्बंध लादले आहेत. खातेदारांना पैसे काढता येत नसून अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे १५ सदस्यीय खातेदारांचे शिष्टमंडळ माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आज(गुरुवारी) मुंबईत भेटणार आहे. याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी खातेदार त्यांना करणार आहेत.
पीएमसी बँकेच्या अडीच हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात सारंग वाधवान, राकेश वाधवान व वरीयाम सिंग या तिघांना मुंबईतील दिवाणी न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. न्यायालयाने तिघांना 23 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल.
पीएमसी बँक घोटाळ्यामुळे तणावाखाली आलेल्या दोन बँक ग्राहकांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता. मात्र, अजून कुठलाही राजकारणी त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला आला नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या आयुष्याची कमाई मिळणार नसेल तर आम्ही या निवडणुकीत कोणालाही मतदान करणार नाही, असा इशारा बँक ग्राहकांनी सरकारला दिला आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेच्या आणखी एक संचालक सुरेंद्र सिंग अरोरा याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आत्तापर्यंत पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी एकूण चार जणांना अटक झाली आहे. या घोटाळ्याप्रकरणी 4050 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा 90 दिवसांमध्ये तपास पूर्ण केला जाईल. खातेदारांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे. बँकेवर निर्बंध लादल्यामुळे खातेधारकांना बँकेतून पैसे काढून घेता येत नाहीत.