हैदराबाद -पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज हैदराबादेतील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अॅकॅडमीतील प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. आज १३१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या तुकडीचा दीक्षांत सोहळा पार पडला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयपीएस अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी काश्मीरातील दहशतवादावर वक्तव्य केले. 'काश्मीरातील तरुणांना चुकीच्या वाटेवर जाण्यापासून रोखण्याची गरज आहे. जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच त्यांना रोखण्याची गरज आहे. महिला पोलीस कर्मचारी स्थानिक महिलांशी संपर्क वाढवून परिस्थितीत बदल घडवून आणू शकतात', असे मोदी म्हणाले.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी कोरोनाचा सामना करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. खाकी वर्दीतील मानवी चेहरा कोरोना काळात चांगले काम केल्यामुळे जनतेच्या मनात कोरला गेला आहे. पोलिसांनी वर्दीची ताकद दाखविण्यापेक्षा वर्दीचा अभिमान बाळगायला हवा. खाकीचा आदर कधीही विसरू नका, असे मोदी म्हणाले.