नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चेन्नई ते पोर्ट ब्लेअर यांना जोडणाऱ्या सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल लिंक या प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. हा कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपन्न होईल,अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.
पोर्ट ब्लेअर सोबतच ऑप्टिकल फायबर केबल स्वराज द्वीप, लिटल अंदमान, कार निकोबार, कामोर्टा, ग्रेट निकोबार, लाँग आयलँड आणि रंगतला जोडण्यात येणार आहे. या कनेक्टिव्हिटीमुळे अंदमान आणि निकोबार बेटांवर भारताच्या इतर भागाच्या तुलनेत वेगवान आणि अधिक विश्वासार्ह मोबाइल सेवा आणि लँडलाईन टेलिकॉम सेवा पोहोचविणे शक्य होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 डिसेंबर 2018ला पोर्ट ब्लेअर येथे या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. या प्रकल्पाचे “उद्घाटन झाल्यानंतर, ओएफसी लिंकमुळे बॅन्डविड्थची क्षमता चेन्नई ते पोर्ट ब्लेअर दरम्यान प्रति सेकंद 2x 200 गीगाबीट्स आणि पोर्ट ब्लेअर व अन्य बेटांदरम्यान 2x 100 जीबीपीएसची असेल,” असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
हा प्रकल्प कार्यान्वित होत असल्याने अंदमान निकोबार बेंटांवर विश्वासार्ह, मजबूत आणि उच्च-वेगवान टेलिकॉम आणि ब्रॉडबँड सुविधांची तरतूद करणे ग्राहकांच्या दृष्टीकोनातून, तसेच धोरणात्मक व कारभाराच्या कारणास्तव महत्त्वाचे ठरेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. उपग्रहांद्वारे पुरवल्या जाणार्या मर्यादित बॅकहोल बँडविड्थमुळे अडचणीत आलेल्या 4 जी मोबाइल सेवांमध्येही मोठी सुधारणा दिसून येईल.
दूरसंचार व ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीमुळे अंदमान व निकोबार बेटांमधील पर्यटन व रोजगार निर्मितीला चालना मिळेल, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल व राहणीमान वाढेल. चांगल्या कनेक्टिव्हिटीमुळे टेलिमेडिसीन आणि टेलि एज्युकेशन यासारख्या ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेसची सेवा सुलभ होईल. लघु उद्योगांना ई-कॉमर्समधील संधींचा फायदा होईल, तर शैक्षणिक संस्था ई-लर्निंग आणि ज्ञानासाठी बँडविड्थच्या वाढीव उपलब्धतेचा उपयोग करतील.व्यवसाय प्रक्रिया आऊटसोर्सिंग सेवा आणि इतर मध्यम आणि मोठे उद्योग देखील या चांगल्या कनेक्टिव्हिटीचा लाभ घेऊ शकतात.
हा प्रकल्प केंद्रीय दूर संचार मंत्रालयामार्फत युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (यूएसओएफ) च्या माध्यमातून पूर्ण करण्यात आला. दूरसंचार सल्लागार इंडिया लिमिटेडने (टीसीआयएल) तांत्रिक सल्लागार म्हणून या प्रकल्पाचे काम पाहिले. भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) हा प्रकल्प पूर्ण केला आहे. सुमारे 2300 किलोमीटरची सबमरीन ओएफसी केबल जोडण्यासाठी सुमारे 1224 कोटी रुपये खर्च करण्यात आला असून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात आला आहे.