अहमदाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौर्यावर असून आज ते माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करणार आहेत. तसेच पंतप्रधान स्टॅच्यू ऑफ युनिटी ते साबरमती रिव्हरफ्रंट दरम्यान भारतातील पहिल्या सीप्लेन सेवेचे उद्घाटनही करणार आहेत. केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
एकावेळी 12 प्रवाशी उड्डाण करू शकतील
स्पाइस जेटची उपकंपनी असलेल्या स्पाइस शटलद्वारे सीप्लेन विमाने चालविली जातील. स्पाइसजेट कंपनीने ट्विन ऑटर 300 सीप्लेन भाड्याने घेतले आहेत, ज्यामध्ये एकावेळी 12 प्रवाशी उड्डाण करू शकतील. उद्घाटनानंतर केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ), गुजरात पोलीस यांची एकता दिवस परेड होणार आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सिव्हिल सर्व्हिसेस प्रोबेशनरशी संवाद साधणार आहेत.
गुजरातमधील पहिल्याच दिवशी पंतप्रधानांनी आरोग्य व्हॅन, एकता मॉल, चिल्ड्रन न्यूट्रिशन पार्क, सरदार पटेल प्राणीशास्त्र पार्क किंवा जंगल सफारी आणि बोट चालविण्यासह 17 नवीन प्रकल्पांचे उद्घाटन केले.