मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवार) दुपारी 4 वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत. एकीकडे देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवर तणाव कायम आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
पंतप्रधान मोदी आज आपल्या भाषणातून आत्मनिर्भर भारत अभियानावर आणखी भर देतील. दुसरीकडे देशात कोरोनाचे रुग्ण ५ लाखांवर गेले आहेत. यामुळे जनतेला कोरोनाच्या संसर्गाबाबत अधिक जागरूक करतील, असे बोलले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आधी रविवारी 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला होता. यात त्यांनी कोरोना, टोळधाड आणि लडाखमध्ये वीरमरण आलेल्या जवानांविषयी भाष्य केले होते. यात त्यांनी चीनचे नाव न घेता, भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याला योग्य उत्तर जवानांनी दिले, असल्याचं म्हटलं होतं.
पुढे ते म्हणाले, कोरोना संकट काळात देश लॉकडाऊनमधून बाहेर आला आहे. आता आपण अनलॉक-1 मध्ये आहोत. यात आपल्याला दोन गोष्टीवर लक्ष्य द्यावे लागणार आहे. पहिली म्हणजे कोरोनाला हरवणे आणि दुसरी म्हणजे अर्थव्यवस्था मजबूत करणे.
दरम्यान, देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जगात सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशाच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. देशात 5 लाख 48 हजार 318 हून अधिक रुग्ण आहेत. यात 16 हजार 475 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे भारत-चीन यामध्ये सीमारेषावरुन तणाव कायम आहे. सोमवारी भारत सरकारने 59 चीनी अॅपवर बंदी घातली आहे. या सर्व घटनाच्या पार्श्वभूमीवर मोदी आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
हेही वाचा -अनलॉक-2 साठी गाइडलाइन जारी; कंटेन्मेंट झोन वगळता काय सुरू राहणार काय राहणार बंद, जाणून घ्या...
हेही वाचा -कोरोनावरील पहिली भारतीय लस तयार; 'कोव्हॅक्सिन'ची मानवी चाचणी होणार जुलैमध्ये..