नवी दिल्ली -चीनने भारताची जमीन कशी बळकावली? हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला सांगावे, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले आहे. तसेच चीनबरोबरचा सीमावाद भारत कसा हाताळणार? याचीही माहिती द्यावी, असे सोनिया गांधी म्हणाल्या.
“चीनने भारताची जमीन कशी बळकावली आणि आपल्या धाडसी जवानांना वीरमरण कसे आले, हे पंतप्रधानांनी सांगावे”, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. चीनबरोबर झालेल्या सीमावादात पूर्व लडाखमधील गलवान व्हॅली येथे 20 भारतीय जवानांना वीरमरण आले, त्याच्या दुसऱ्याच दिवशी सोनिया गांधींनी ही मागणी केली आहे.
देशभरातमध्ये चिनी अतिक्रमाणाविरोधात क्रोध व्यक्त केला जात आहे. मोदींनी पुढे येऊन सांगावे की, चीनने कशा प्रकारे भारतात अतिक्रमण केले, असे सोनिया गांधींनी व्हीडिओ संदेशाद्वारे सांगितले. याबरोबरच भारतीय जवान कसे जखमी झाले आणि अजूनही बेपत्ता कसे आहेत, हे सांगावे. पंतप्रधानांनी देशाला आत्मविश्वासात घ्यावे, अशी मागणी करतच पक्षाचा सरकारला पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले.
या संकटकाळात काँग्रेस पक्ष लष्करासोबत आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत उभा आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या. आपले किती सैनिक आणि अधिकारी बेपत्ता आहेत? तर किती सैनिक आणि अधिकारी गंभीर जखमी आहेत? कोणत्या भागात चीनने अतिक्रमण केले आहे? ही परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारची योजना काय? या प्रश्नांची उत्तरे सरकारे द्यावीत, असे सोनिया गांधी म्हणाल्या.