नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना संकटाने थैमान घातले असून भारतामध्ये रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक आणि सह-संस्थापक बिल गेट्स यांच्याशी संवाद साधला.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोरोनाचे आव्हान आणि या भयानक साथीला सामोरे जाण्यासाठीच्या उपायांवर दोघांनी चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी कोरोना विषाणूच्या साथीवर लढण्यासाठी भारताने केलेल्या उपाययोजनांचीही गेट्स यांना माहिती दिली.
भारत सर्व नागरिकांच्या सहभागाने कोरोनाविरूद्ध जोरदार लढाई लढत आहे. आम्ही कोरोनासंदर्भातील माहिती सर्वांपर्यंत पोहोचवत आहोत. जगातील विविध देश देखील याचा लाभ घेऊ शकतात. या विषम परिस्थितीत पूर्वग्रह न ठेवता सर्वांनी एकत्र यायला हवे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
लोकांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेद औषधे देखील वापरली जात आहेत. स्वच्छतेवर जोर देण्यात येत आहे. या सर्व गोष्टींमुळे भारताला कोरोना साथीविरोधात लढा देण्यास बळ मिळाल्याचे मोदींनी सांगितले.
गेट्स फाऊंडेशनच्या आरोग्यविषयक कामांची मोदींनी प्रशंसा केली. तसेच जगाच्या हितासाठी भारताच्या क्षमतांचा अधिकाधिक उपयोग कसा करता येईल, या संदर्भात त्यांनी बिल गेट्सकडे सूचना मागितल्या.
यापूर्वी बिल गेट्स यांनी मोदींना पत्र लिहिले असून कोरोनाविरोधातील भारताच्या लढाईचं आणि मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले होते. कोरोनाविरोधातील लढाईत सरकारने योग्य वेळी आवश्यक पावले उचलली आहेत. भारतामधील कोरोनाच प्रसार कमी करण्यासाठी सरकारने मोदींच्या नेतृत्वाखाली योग्य निर्णय घेतले आहेत. सार्वजनिक आरोग्यामध्ये संतुलन साधण्याचा आणि सामाजिक संरक्षण सुनिश्चित करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे, असे बिल गेट्स यांनी पत्रामध्ये होते.