नवी दिल्ली -देशात सध्या कोरोना विषाणूची दहशत आहे. सरकारकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहे. मात्र, या सर्व उपाययोजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवणे आवश्यक असते. हे काम देशातील माध्यमांद्वारे चोखपणे पार पाडले जात आहे. यासाठीच देशातील प्रमुख माध्यमांच्या प्रमुखांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. यावेळी त्यांनी ईटीव्ही भारतचे चेअरमन रामोजी राव यांच्यासोबत देखील बातचीत केली. रामोजी राव यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांना महत्वाचे तीन सल्ले दिले.
पंतप्रधान मोदी आणि ईटीव्ही भारतचे चेअरमन रामोजी राव यांची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे चर्चा हेही वाचा...COVID-19 LIVE : आवश्यक असेल तिथे कर्फ्यू लागू करा, केंद्राचे राज्यांना निर्देश..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील माध्यम प्रमुखांसोबत चर्चा केली. त्यावेळी त्यांनी 'देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात कोरोनाबाबत माहिती प्रसारित करण्यासाठी आणि सरकारच्या सुचनांना पोहचवण्यासाठी प्रसारमाध्यमे प्रशंसनीय भूमिका बजावत आहे' असे म्हटले. तसेच, 'देशातील माध्यमे ही शहरांपासून गाव-खेडे यांपर्यंत पसरली आहेत. त्यामुळे माध्यमांनी या काळात सरकार आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करणे अपेक्षित आहे' असे म्हटले आहे.
ईटीव्ही भारतचे चेअरमन रामोजी राव यांच्यासोबत पंतप्रधानांनी केली चर्चा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महत्वाच्या माध्यम समुहांच्या प्रमुखांसोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बातचीत केली. त्यावेळी त्यांनी ईटीव्ही भारतचे चेअरमन रामोजीराव यांच्यासोबत देखील चर्चा केली आहे. हैदराबाद स्थित ईटीव्ही भारत हे देशातील तेरा भाषांमध्ये बातमी देणारे एकमेव वेब पोर्टल आहे. रामोजी राव हे ईटीव्ही भारतचे चेअरमन आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामोजी राव यांच्या सोबत देशातील कोरोना विषाणूच्या परिस्थिती विषयी चर्चा केली. यावेळी रामोजी राव यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांना परिस्थितीचे गांभीर्य दाखवत महत्वाचे तीन सल्ले दिले आहेत.
रामोजी राव काय म्हणाले?
१) भारतातील ६५ टक्के जनता ग्रामीण भागात राहते. या ग्रामीण भागातील जनतेत माध्यम समूह रात्रंदिवस जनजागृती करत राहतील. मात्र, सरकारनेही काही कडक उपाययोजना राबवायला हव्यात. ग्रामीण भागातील ६५ टक्के जनतेचे कोरोनापासून रक्षण करुन आपण आरोग्य यंत्रणांवरील ताण कमी करायला हवा.
२) 'मेक इन इंडिया' मोहिम भारतात तुमच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे. भारतातील फार्मसी इंडस्ट्री चांगले काम करत आहे, याचा मला अभिमान आहे. विविध आजारांवर लस आणि औषधं बनवण्याचं काम ते आधीपासूनच करत आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी या फार्मसी उद्योगांना सरकारने सहकार्य करायला हवे. या उद्योगांची मदतही सरकारने घ्यायला हवी. त्यामुळे संशोधनाला चालना मिळून लवकरात लवकर औषध तयार होईल.
३) कोरोना संकटामध्ये आपल्याला चीन आणि इटलीकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. या देशांचा अनुभव आपल्या कामी येईल. आपल्या सरकारमधील तज्ज्ञांनी चीन आणि इटलीने राबवलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करावा. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला उपाययोजना राबवता येतील आणि लोकांचे या संकटापासून संरक्षण करता येईल.