माली- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीव येथे पोहोचले आहेत. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद सोलिह यांनी नरेंद्र मोदींची स्वागत केले. मोदींना यावेळी 'गार्ड ऑफ ऑनर'ने सन्मानित करण्यात आले. मालदीव सरकार नरेंद्र मोदींना देशाचा सर्वोच्च सन्मान 'रुल ऑफ निशान इज्जुद्दीन' याने सन्मानित करणार आहे.
मोदींचा मालदीवचा सर्वोच्च पुरस्कार नरेंद्र मोदी मालदीवला पोहचल्यानंतर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मोदींनी राष्ट्रपती मोहम्मद सोलीह यांची भेट घेत त्यांना भारतीय क्रिकेटपटूंची स्वाक्षरी असलेली बॅट दिली. यानंतर मोदींचा सर्वाच्च नागरी पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर दुसऱयांदा पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नरेंद्र पहिल्यांदा मालदीव दौऱ्यावर गेले आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी २०११ साली पहिल्यांदा मालदीवच्या संसदेला संबोधित केले होते. परंतु, २ वर्षानंतर मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदी अब्दुला यामीन यांची निवड झाली. यानंतर, परिस्थितीत बदल होवून भारत-मालदीव संबंध बिघडले होते.
पंतप्रधान मोदी मालदीवच्या राष्ट्रपतींची भेट घेताना अब्दुला यामीन यांना चीनचे पूर्ण समर्थन आहे. यामुळे भारत-मालदीव संबंधात बदल झाले होते. यामीन यांना चीनचे समर्थन भारतासाठी चिंतेचा विषय आहे. मालदीव येथे चीनची वाढणारी उपस्थिती भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकत होती. परंतु, मागीलवर्षी मोहम्मद सोलिह यांची राष्ट्रध्यक्षपदी निवड झाल्यानंतर परिस्थितीत बदल झाले आहेत. सोलिह यांच्या शपथविधीला स्वत: नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहून दोन्ही देशातील तणावपूर्ण परिस्थिती दुर केली. पंतप्रधान झाल्यानंतर मालदीवला भेट देवून मोदींनी मजबूत संदेश दिला आहे.
मोदी सरकार सध्या शेजारील देशांसोबत संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. या गोष्टीला प्राधान्य देताना शपथविधी सोहळ्याला बिम्सटेक राष्ट्रांना आमंत्रित करण्यात आले होते.