नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे खासदारांसाठी बांधलेल्या गृहसंकुलाचे अनावरण केले. राष्ट्रीय राजधानीतील डॉ बी डी मार्गावर हे गृहसंकूल आहेत. हे गृहसंकूल बांधण्यासाठी 80 वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या आठ बंगल्यांचा पुनर्विकास करण्यात आला आहे. कोरोना असतानाही या गृहसंकुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून मंजूर खर्चापेक्षा जवळजवळ 14 टक्के बचत झाली आहे. या कार्यक्रमास लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हेदेखील उपस्थित होते. त्यांना मोदींनी आपल्या संबोधनादरम्यान वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
भाजपा सरकारच्या काळात बर्याच इमारतींचे बांधकाम सुरू झाले आणि ते नियोजित वेळेपूर्वीच संपले. अटलजी यांच्या काळात आंबेडकर राष्ट्रीय स्मारक उभारण्याविषयी चर्चा झाली होती. तेही याच सरकारमध्ये उभारण्यात आले. आमच्या सरकारमध्ये केंद्रीय माहिती आयोगाची नवीन इमारत बांधली गेली. आपल्या देशात हजारो पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपले प्राण दिले आहेत. त्याचेही राष्ट्रीय पोलीस स्मारक बांधण्यात आले, असे मोदी म्हणाले. तथापि, आज मोदींनी अनावरण केलेल्या या गृहसंकुलात 76 फ्लॅट आहेत.