मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज मुंबईतील ३ मेट्रो मार्गिकांचे भूमिपूजन करण्यात आले. वांद्रे-कुर्ला-संकुलामध्ये मेट्रो 10, 11, 12 या तीन मार्गिकांचे भूमिपूजन झाले. या तीन मेट्रो मार्गिकांसह मेट्रो भवनचेही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल. पंतप्रधान मोदींनी सर्व सोयींनी युक्त अशा मेट्रो ट्रेनच्या डब्यात चढून पाहणी केली. हा मेक इन इंडियाअंतर्गत भारतात तयार झालेला मेट्रोचा पहिलाच डबा आहे.
या कार्यक्रमांसाठी मोदींचे मुंबईच्या विमानतळावर काही वेळापूर्वी आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांचे स्वागत केले.
गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) मेट्रो-10 आणि कल्याण ते तळोजा मेट्रो-12 महानगर प्रदेशातील चाकरमान्यांसाठी तर वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मेट्रो-11 ही मार्गिका वडाळ्याहून दक्षिण मुंबईकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी उपयोगी ठरणार आहे.