नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. 'भारत हा उत्सवांचा देश आहे. आमच्याकडे हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा आहे,' असे ते म्हणाले. समाजामध्ये वितुष्ट निर्माण होणे थांबवले पाहिजे असे ते म्हणाले. ते द्वारका येथील रामलीला मैदानावर बोलत होते. त्यांनी ३ वेळा 'जय श्री राम' म्हणून बोलण्यास सुरुवात केली. यानंतर मोदींच्या हस्ते १०७ फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
'उत्सव हा भारताच्या सामाजिक जीवनाचा प्राण आहे. उत्सव आपल्याली नवी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देतात,' असे मोदी म्हणाले. 'आम्ही बदलांचा स्वीकार करतो. उत्सवामुळे नवी संचार शक्ती मिळते. वर्षांच्या 365 दिवसांमध्ये असा दिवस क्वचितच असेल, जेव्हा भारतातील कुठल्या ना कुठल्या ठिकाणी कुठला तरी उत्सव साजरा केला जात नसेल,' असे ते पुढे म्हणाले.
पंतप्रधान मोदी रावण वध करताना 'उत्सव आपल्याला जोडतात आपल्यात उत्साह निर्माण करतात, हे आपल्या नसानसांत भिनलेले आहेत. ते आपल्या संस्कार, शिक्षण व सामाजिक जीवनाचे घटक आहेत. उत्सव आपल्या सामाजिक जीवनासाठी प्राण तत्त्व आहे. आईचा, मुलीचा सन्मान, गौरव आणि तिची प्रतिष्ठा जपण्याचे, तिचे संरक्षण करण्यासाठी संकल्प करणे ही आपली जबाबदारी आहे. यंदाच्या दिवाळीत सामूदायिक कार्यक्रमाचे आयोजन करून ज्या मुलींनी जीवनात काही मिळवले आहे, ज्यांच्याद्वारे इतरांना प्रेरणा मिळते त्यांचा सन्मान केला जावा. या दिवाळीत हेच आपले लक्ष्मीपूजन असायला हवे,' असे मोदी म्हणाले.
'आज विजयादशमीचा मुहूर्त आहे व याबरोबर आपल्या हवाई दलाचा देखील जन्मदिवस आहे, असे म्हणत त्यांनी या निमित्त आपण आपल्या हवाई दलाच्या जवानांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करू असे उपस्थितांना आवाहन केले. नागरिकांनी आपण अन्न वाया न घालवणे, वीज व पाण्याची बचत करण्याचा निश्चय करायला हवा,' असेही ते म्हणाले.