नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. याशिवाय त्यांनी भारताच्या एकतेवरही भाष्य केले. दिवाीळीचा प्रकाश सर्वदूर पसरून त्याने शत्रुत्वाची भावना समाप्त करून टाकावी, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
दिपावली केवळ भारतात नाही, तर जगभरात साजरी केली जाते. सध्या जगभरात फेस्टीव्हल टुरिझमचेही आकर्षण वाढत आहे. आमचा भारत देश हा सणांचा देश आहे. आपल्या देशात फेस्टिव्हल टुरिझमचा विकास करण्यासाठी मोठा वाव आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी फेस्टिव्हल टुरिझमकडे सर्वांचे लक्ष वेधले. दिवाळी, होळी, ओणम, पोंगल, अशा सर्व सणांचा प्रसार करायला हवा. इतकेच नाही, तर आपल्या या आनंदात इतर राज्ये आणि देशांनाही सहभागी करून घ्यावे असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.