महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'अनादी काळापासून पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लासाठी मंदिराची निर्मिती'

श्रीराम हे कोट्यवधी लोकांच्या आस्थेचे प्रतिक आहे. हे मंदिर आमच्या राष्ट्रीय भावनेचे प्रतिक बनेल आणि भारतीयांच्या सामूहिक संकल्प शक्तीचेही प्रतिक आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

By

Published : Aug 5, 2020, 3:39 PM IST

Updated : Aug 5, 2020, 3:44 PM IST

अयोध्या - आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन पार पडले. यावेळी १७५ निमंत्रितांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती. 'आजचा हा क्षण संपूर्ण देशासाठी भावनात्मक आहे. देशातील प्रत्येक हृदय आज आनंदात आहे', असे यावेळी बोलताना मोदी म्हणाले.

राम मंदिर भूमिपूजनादरम्यान पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -

'राम आमच्या मनामनात आहेत. आमच्या हृदयात आहेत. श्रीराम यांचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. मात्र राम आजही आमच्या प्रत्येकाच्या मनात बसलेले आहेत. श्रीराम आमच्या संस्कृतीचे आधार आहेत', असेही मोदी यावेळी म्हणाले. श्रीराम हे कोट्यवधी लोकांच्या आस्थेचे प्रतिक आहेत. हे मंदिर आमच्या राष्ट्रीय भावनेचे आणि लोकांच्या सामूहिक संकल्प शक्तीचेही प्रतिक आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

श्रीराम यांचे चरित्र आणि आदर्श महात्मा गांधींच्या रामराज्याचा मार्ग आहे. राम हे आधुनिकतेचे प्रतिक आहेत. राम यांच्यापासून प्रेरणा घेऊनच आज भारत पुढे जात आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. मला विश्वास आहे की आपण सर्व पुढे जात राहू. देश पुढे जाईल. भगवान राम यांचे मंदिर वर्षानुवर्षे मानवतेला प्रेरणा देत राहिल, मार्गदर्शन करेल, असेही मोदी यावेळी म्हणाले.

राम मंदिराच्या निर्मितीनंतर केवळ अयोध्येच्या भव्यतेत वाढ होणार नाही तर या क्षेत्राची अर्थव्यवस्थाही बदलेल. येथे प्रत्येक क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील. संपूर्ण जगातून लोक याठिकाणी येतील. संपूर्ण विश्व श्रीराम आणि माता जानकी यांच्या दर्शनासाठी अयोध्येत येईल, असेही पंतप्रधान म्हणाले. आपण पुढे जायला हवे, असा संदेश श्रीराम देत असल्याचेही मोदींनी सांगितले.

अयोध्येत बनणारे मंदिर श्रीराम यांच्या नावाप्रमाणेच भारतीय संस्कृतीच्या समृद्ध परंपरेला अधोरेखित करणार. संपूर्ण मानवजातीला हे मंदिर अनेक पिढ्यांपर्यंत प्रेरणा देत राहील यावर माझा विश्वास आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. जेव्हा कधी मानवतेने श्रीराम यांना आदर्श मानले तेव्हा विकास झाला आहे हे आपण लक्षात घेण्यासारखे आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले.

राम मंदिराच्या आंदोलनात संघर्ष आणि संकल्प होता. ज्यांच्या त्याग, बलिदान आणि संघर्षामुळे हे स्वप्न साकार होत आहे त्या सर्वांना मी नमन करतो, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. आज संपूर्ण भारत भावनिक आहे. अनंत काळापासूनची प्रतिक्षा आज समाप्त होत आहे. अनेकांना यावर विश्वासच होत नसेल की ते या पवित्र दिवसाला पाहत आहेत. अनादी काळापासून टेंटमध्ये राहणाऱ्या रामलल्लाला अखेर भव्यमंदिर मिळणार असेही ते यावेळी म्हणाले.

Last Updated : Aug 5, 2020, 3:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details