नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू करण्यात आलेले लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा केली. १४ एप्रिलला संपणारा हा लॉकडाऊन, आता ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे.
यादरम्यान, देशातील हॉटस्पॉट्सची संख्या वाढणार नाही, याची खबरदारी आपणच घेणे गरजेचे असल्याचे मोदी म्हटले. २० एप्रिलपर्यंत देशातील प्रत्येक भागांची कसून तपासणी करण्यात येणार आहे. त्यानुसार, तिथल्या परिस्थितीनुसार तिथले निर्बंध कितपत कठोर करायचे, याचा निर्णय घेतला जाईल, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
लॉकडाऊन दरम्यान करा या 'सप्तपदींचे' पालन; पंतप्रधान मोदींचे आवाहन.. यावेळी मोदी यांनी नागरिकांना सात नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. ते सात नियम, म्हणजेच मोदींची 'सप्तपदी' पुढीलप्रमाणे..
- घरातील वृद्धांची काळजी घ्या..
- लॉकडाऊनचं पालन करा..
- आयुष्य मंत्रालयाच्या सुचनांचे पालन करा..
- आरोग्य सेतू मोबाईल अॅप डाऊनलोड करा..
- गरीब परिवारांसाठी भोजनाची सोय करा..
- नोकरीवरून कोणालाही काढू नका..
- अत्यावश्यक सेवेतील लोकांचा आदर करा..
या सात नियमांचे पालन करण्याचे आवाहन मोदींनी जनतेला केले आहे. यासोबतच, हॉटस्पॉटमध्ये असणाऱ्या लोकांसाठी नवी नियमावली उद्या केंद्र सरकार जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :COVID-19 : देशातील कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी, पहा एका क्लिकवर..