नवी दिल्ली - देशवासियांनी रविवारी रात्री 9 वाजता घरातील दिवे घालवून 9 मिनिटं मेणबत्ती, टॉर्च, दिवे, पणती लावून पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे यामध्ये मोदींची आई हीराबेन यांनीही पणती लावत आपल्या मुलाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
मोदींच्या आवाहनाला आईचाही प्रतिसाद, हीराबेन यांनी घरात लावली पणती - Heeraben
पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला आई हीराबेन यांनीही पणती लावत प्रतिसाद दिला.
हिराबेन सध्या गुजरातमध्ये कुटुंबासोबत राहातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक निर्णयाचे त्यांनी समर्थन केले आहे. यापूर्वी हिराबेन यांनी जनता कर्फ्यूच्या दिवशी कोरोनाविरोधात लढा देणाऱ्याच्या योगदानाला थाळी वाजवत सलामी दिली होती. तसेच पीएम रिलीफ फंडमध्ये मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांनीही 25 हजार रुपयांची आर्थिक मदतही केली आहे.
वैश्विक महामारी कोरोना व्हायरसच्या संसर्गाने संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. भारतातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या कठीण परिस्थितीमध्ये सर्व जण एकजुटीने या संकटाचा सामना करत आहे. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी आपल्या घरात राहून दिवा लावला आणि कोरोना विरोधातली एकजूट दाखवून दिली. काही लोकांनी पणत्यांची रोषणाई केली. तर काहींनी दिव्यांनी 'गो कोरोना गो' असे लिहित कोरोनाला देशातून हाकलून लावण्याचा संकल्पही दाखवून दिला.