नवी दिल्ली - अम्फान सुपर सायक्लोनमुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महाचक्रीवादळात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली.
नुकसानग्रस्त भागांची पंतप्रधान पाहणी करतील. तसेच आढावा बैठकीमध्ये मदत आणि पुनर्वसन या पैलूंवर चर्चा केली जाईल. कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे लागू केलेल्या लॉकडाऊननंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजधानी दिल्ली बाहेरचा हा पहिला दौरा आहे. पंतप्रधान सकाळी पश्चिम बंगालचा दौरा करतील. त्यानंतर ओडिशाकडे रवाना होतील.