नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना' आणि ई-गोपाल अॅप उद्या लाँच करणार आहेत. मत्स्योद्योग क्षेत्राचा शाश्वत विकास करण्यासाठी सरकार ही योजना सुरू करणार आहे. त्यासाठी पुढील पाच वर्षांत आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत २० हजार ५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने सागरी तसेच इतर पाण्यातील मासेमारीसाठी १२ हजार ३४० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित केली आहे. तर मत्स्य उद्योगाच्या पायाभूत सुविधा आणि मत्स्यपालनासाठी ७ हजार ७१० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. केंद्र सरकारने २०२४-२५ पर्यंत आणखी ७० लाख टन मत्स्य उत्पादन करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. तर, २०२४-२५ पर्यंत मत्स्योद्योगातील निर्यात १ लाख कोटी रुपयांची करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यामधून मच्छीमार आणि मत्स्योत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, अशी सरकारला अपेक्षा आहे. शिवाय, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या ५५ लाख जणांना रोजगार मिळेल, अशी केंद्र सरकारला अपेक्षा आहे.