नवी दिल्ली -पंतप्रधान मोदी आज सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोविड लस विकसित करण्यात सहभागी असलेल्या तीन टीमसोबत संवाद साधणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार मोदी जेनोवा बायोफर्मा, बायोलॉजिकल ई आणि डॉ. रेड्डीज यांच्याशी संवाद साधतील.
"उद्या ३० नोव्हेंबर, २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोविड-१९ ची लस तयार करण्यात सहभागी असलेल्या तीन टीमसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील. ते ज्या गटांशी संवाद साधणार आहेत ते जेनोवा बायोफर्मा, बायोलॉजिकल ई आणि डॉ. रेड्डी आहेत," असे ट्विट रविवारी पंतप्रधान कार्यालयाद्वारे करण्यात आले.
शनिवारी पंतप्रधान मोदींनी पुण्यातील सिरम इंस्टिट्यूटला भेट दिली होती. कोविडची तयार होणारी लस, उत्पादन, लस तयार करताना येणारी आव्हाने आणि त्यासंदर्भातील पूर्वतयारीचा एक भाग म्हणून मोदींनी ही भेट दिली. याशिवाय त्यांनी अहमदाबाद येथील जायडस बायोटेक पार्कलादेखील भेट दिली. त्यानंतर हैदराबादेतील भारत बायोटेकला भेट दिली. या तिन्ही ठिकाणी त्यांनी लसींचा विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला.
देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ९३ लाख ९२ हजार ९२० झाली आहे. तर, एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाख ५३ हजार ९५६वर पोहोचली आहे. एकूण बरे झालेल्यांची संख्या ८८ लाख २ हजार २६७ झाली असून शनिवारी ४२ हजार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
हेही वाचा-देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर