नवी दिल्ली - येत्या २१ जूनला होणाऱ्या 'जागतिक योग दिवसा'निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. यापूर्वी ठरलेल्या नियोजनानुसार, ते लेहमधून देशाला संबोधित करणार होते. मात्र, कोरोना महामारी आणि भारत-चीन सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवर यात बदल करण्यात आला आहे. आता त्यांचे संबोधन हे दिल्लीमधून होणार आहे.
यावेळी बोलताना ते आजच्या जीवनात योगाचे महत्त्व याबाबत तर बोलतीलच. मात्र भारत-चीन सैन्यामध्ये झालेल्या झटापटीबाबत ते काही बोलतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी स्वतः योग सादर करतानाचे थेट प्रक्षेपणही दूरचित्रवाणीवरुन केले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
२१ जूनला सकाळी सातच्या सुमारास ते जनतेला संबोधित करतील. साधारणपणे एक तास हा कार्यक्रम चालेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
गेल्या वर्षी जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी रांचीमध्ये भव्य इव्हेंटचे आयोजन केले होते. त्याप्रकारचा इव्हेंट यावर्षी लेहमध्ये पार पडणार होता. मात्र, कोरोना महामारी आणि भारत-चीन सीमा तणाव यामुळे हा इव्हेंट रद्द करण्यात आला आहे.
सोमवारी लडाख प्रांतातील गलवान व्हॅलीमध्ये दोन्ही देशांच्या सैन्यात झटापट झाली. यावेळी कोणत्याही प्रकारचा गोळीबार झाला नसला, तरीही झटापटीत २० भारतीय सैनिकांना वीरमरण आले. तसेच चीनच्या सैन्यातील ४२ जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येते. यामध्ये मृतांची संख्या देखील मोठी आहे. यानंतर सीमेवरील तणाव वाढला आहे. यानंतर आज पंतप्रधान मोदी यांनी, वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. तसेच, शुक्रवारी याबाबत चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचेही आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा :'मोदीजी समोर या..चीन विरोधात उभं राहायची हीच वेळ'