नवी दिल्ली -कोलंबोत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटामध्ये मृतांचा आकडा वाढून २०७ वर पोहेचला आहे. या मृतांमध्ये ३ भारतीयांचा समावेश असल्याचे श्रीलंकेतील भारतीय दूतावासाने सांगितले आहे. तर, कोणत्याही प्रकराचे मानवीय सहाय्य करण्याची तयारी भारताने दर्शवली आहे.
श्रीलंकेत झालेल्या बॉम्ब स्फोटामुळे संपूर्ण जगाला हादरा बसला आहे. या घटनेचा भारताने निषेध नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी तेथील दूतावसातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेत काही भारतीयांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या बद्दल संपूर्ण माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
श्रीलंकेच्या कोलंबो आणि इतर काही भागांत साखळी बॉम्बस्फोट झाले. याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या कठीण प्रसंगी भारत श्रीलंकेसोबत असल्याचे मोदींनी म्हटले आहे. त्यांनी मृतांविषयी शोक व्यक्त केला आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्याविषयी शोक व्यक्त केला. त्यांनी श्रीलंकेच्या जनतेसोबत असल्याचे सांगितले. निरपराध लोकांना लक्ष्य करून करण्यात येणाऱ्या हिंसेला समाजात जागा नाही, असे ट्विट त्यांनी केले आहे.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी कोलम्बोतील भारतीय उच्चायुक्तालयाशी सातत्याने संपर्कात असल्याचे सांगितले. कोलम्बोतील भारतीय उच्चायुक्तालयाने काही हेल्पलाईन क्रमांक भारतीय नागरिकांसाठी जारी केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
हे क्रमांक पुढीलप्रमाणे - +९४७७७९०३०८२, +९४११२४२२७८८, +९४११२४२२७८९, +९४७७७९०२०८२, +९४७७२२३४१७६
कोच्छिकाडे, निगोम्बो या २ ठिकाणची सेंट अँटोनी'ज चर्च, काटुवापिटिया येथील सेंट सेबॅस्टिन्स चर्च आणि बट्टीकलोआ येथील झियोन चर्च येथे हे बॉम्बस्फोट झाले. तसेच, किंग्सबरी, शांग्री-ला आणि सिनॅमॉन ग्रँड या कोलम्बोमधील हॉटेलांमध्येही बॉम्बस्फोट झाले. सकाळी पावणेआठच्या सुमारास हे स्फोट झाले.